वटपौर्णिमा

पहाटे ५.३० ची वेळ, रविवारची पहाट. खरे तर लग्नाला केवळ ६ महिने झालेल्या आणि आठवडाभर माहेरी राहून आलेल्या मला एव्हढ्या पहाटे उठून लिहिण्याचे का बरे पडले असेल? असा विचार खुद्द माझ्याच मनात आला. असे काय विशेष घडले होते अथवा घडणार होते? तसे इतरांच्या दृष्टीने काहीच नाही पण माझ्या दृष्टीने धडकी भरणार कारण होते ते म्हणजे वटपौर्णिमा! खरे तर हा दिवस आत्तापर्यंत माझ्यासाठी इतर दिवसा प्रमाणेच एक असाच होता. पण तीन चार दिवसांपूर्वी सहज कॅलेंडर बघितले आणि डोक्यात प्रकाश पडला. प्रकाश नव्हे तर जरा हाबकलेच. अरे बापरे आपले लग्न झाले आणि आता आपल्याला पण ह दिवस यथासांग साजरा करावा लागणार की काय?  हेच ते कारण होते हबकण्याच. मग डोक्यात विचार आणि तशी कृती सुरू झाली. एखादी गोष्ट आपल्याला घडवून आणायची असेल तर आपण वातावरण निर्मिती सुरू करतो तसच मी काहीसं सुरू केले. नवऱ्यापाशी जरा खोचकपणे  " वटपौर्णिमा आलीय हा" असे बोलले आणि त्याच म्हणने काय आहे ते काढून घेतले.खरे तर असे करायची मला काहीच आवश्यकता नव्हती कारण त्याच मत काहीही असो तो ते माझ्यावर लादेल असा नवरा नाही हे मला ठाऊक होते , पण माझ काय मत आहे हे त्याला कळावे यासाठी आपली खटपट.  असो. तर मग माझ पुढचे कार्य सुरू झाले. वटपौर्णिमा साजरी करण्याची आवश्यकता नसलेल्या पोस्ट फेसबुक वर तर व्हॉटसअप वर मित्रमैत्रिणी भावंडे आणि इतर ग्रूप वर पोस्ट करता राहिले. ह्यामागे एकच विचार की माझे मत देखील हेच आहे हे दर्शविणे. खरे तर जिथे पोस्ट केले होते तिथल्या लोकांना मुळातच माझे विचार माहीतच होते त्यामुळे माझे हे विचार मी सासुशी शेअर करणे अधिक गरजेचे होते पण अर्थातच मी तसे करू शकले नाही. शनिवारी संध्याकाळी गप्पांमध्ये अपेक्षित प्रश्न सासुबाई कडून आलाच. "काय ग, उद्या वटपौर्णिमेची पूजा वगैरे करणार आहेस का?" नाही हे माझ ठाम उत्तर असून सुद्धा मी ते न देता नवऱ्याकडे कटाक्ष टाकला आणि माझ्या हुश्शार नवऱ्याने ते हेरून वडाच्या पूजेची गरज नसून वड लावणे किती गरजेचे आहे हे संगितले. मग त्यावर आमची छानपैकी चर्चा रंगली. आत्ताचा काळ अन आधीचा काळ वगैरे वगैरे. अंतिमतः पाहिले वर्ष म्हणून पूजा कर इथे येऊन चर्चा संपली. खरे तर चर्चा संपली ती इतरांसाठी आणि विषय सुरू झाला तो माझ्या साठी.  झोप तर येईनाच. मग पहाटे डोक्याला तेल लाव, पुस्तक वाचत बस असे करीत राहिले आणि शेवटी न राहून पेन हातात घेतलाच.खरेतर नेमका त्रास कसला होत होता मला? एवढा विषय महत्वाचा होता का? सासूबाईंच्या समाधानासाठी केली वडाची पूजा आणि विषय संपवला केव्हढे सोपे. हे सतत समजावत होते स्वतःला. पण प्रश्न पडला की का साजरी करू ही वटपौर्णिमा? वडाची पूजा करून, त्याला फेऱ्या मारून , दोऱ्या गुंडाळून अन् उपास करून मी एक आदर्श पत्नी हे सिद्ध करायची गरज काय? अजूनही ही अपेक्षा का ठेवली जाते मुलींकडून? एक married नावाचे लेबल एकदा लागले की लगेच ह्या रुढी परंपरा का चिकटतात मुलींना? मुळात एखादी पूजा अथवा व्रत हे केवळ सासूला बरे वाटते म्हणून करण्यात करण्यात logic काय आहे हेच मला समजत नाही. मला पटत नाही हे एवढे कारण पुरेसे नाही का? हा स्वतंत्र विचार अजूनही सासुंना का पटत नाही?  हे असे विचार असूनही मी पूजा करू आणि ऑफिस मध्ये मैत्रिणीनं विचारले , काय केलीस का पूजा तर मी काय उत्तर देऊ? माझ्या विचारांना अनुसरून मी नाही उत्तर देऊन खोटे बोलू की पूजा केल्याचं सांगून ह्या गोष्टीचं समर्थन करू? खूप त्रास दिला ह्या विचाराने मला. कारण नुसते पोस्ट शेअर करणे, चर्चा करणे , आपले मत बोलण्यातून व्यक्त करणे अशी मी नाही. आणि मला तसे बनायचे ही नाही. पण आज मी केवळ बोलणारी ठरेल हा विचार मला अस्वस्थ करत होता. बदल घडवायला हवा हे बोलणे आणि बदल आपल्या घरापासून सुरू करणे ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत ह्याची जाणीव झाली. 
 वटपौर्णिमा खूप छोटा विषय. पण अजूनही रुढी परंपरा ह्या बाबतीत का आपण अडकलो आहोत? आणि मुळात ह्या सगळ्या परंपरा फक्त बायकांनाच का लागू असतात? असा साधा प्रश्न अजूनही बायकांना पडत नाही ह्याचे आश्चर्य वाटते. 
 आमच्या घरी आम्ही दोघी बहिणी. आईचे माहेर अतिशय कर्मकांड असलेलं. तिने ह्या सर्व पारंपरिक गोष्टी अनुभवलेल्या. परंतु मुलींना वाढवताना केवळ आम्ही करायचो म्हणून तुम्ही करा असे न सांगता तुम्हाला जे पटते ते करा असे वाढवले. अश्या विचारांमध्ये मोठी झाले असता अचानक वयाच्या २८ व्या वर्षी बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी करणे हे खरेच अवघड जाते.
शेवटी केवळ वेळ मारून नेण्यासाठी न पटता ही डोके बाजूला ठेऊन ही गोष्ट केलीच तर त्रास नक्कीच होईल पण त्याहून हा विचार जास्त त्रास देतो की उद्या मला मुलगी झाली असता तिला ही मी स्वतंत्र विचारांची घडवेन पण न जाणो तिला देखील लग्नानंतर न पटता अश्या गोष्टी करायची वेळ येवो. 

Comments